१२ महिने २४ किल्ले
१. तोरणागड (प्रचंडगड) गरुडाचे घरटे
हिंदू संस्कृतीमध्ये सणवार आला कि घराभोवती आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचे तोरण लावतात. मी करू घातलेल्या वर्षभराच्या सणाचं तोरण म्हणून मी पहिला किल्ला तोरणागड निवडला. शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असंही म्हणतात. २०१८ च्या उत्तरार्धापासून "१२ महिने २४ किल्ले" हि संकल्पना मनात थैमान घालून होती. पण किल्ले फिरायचे म्हणजे ट्रेकिंग आलंच. आणि त्यासाठी सराव हा असायलाच हवा. जो मी साधारण नोव्हेंबर २०१८ पासून सुरु केला होता. तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी चढला. हि गोष्ट मला तोरणा चढताना प्रेरणा देणारी ठरणार होती. म्हणूनही बहुदा मी तोरणा निवडला असावा.
मोहिमेतील पहिलाच किल्ला असल्याने दुसऱ्या दिवशी आपण थकून जाणार याची कल्पना होती. त्यामुळे जोडून २ दिवस सुट्टी मिळेल अशा दिवशी जायचं ठरलं आणि २६ व २७ जानेवारी असा मुहूर्त निघाला. माझ्या सोबत ऑफिसमधले निखिल, अजित, राहुल, गौरव हे सगळे येणार होते. २६ ला सकाळी ७ वाजता सगळ्यांनी मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नसरापूर फाट्यावर भेटायचे असे ठरले.
त्यादिवशी सकाळी जरा जास्तच थंडी होती. त्यामुळे सगळं काही एकदम झाकून पाकून मी सकाळी ६.१५ ला माझ्या गावावरून निघालो. बाकीचे सगळे जण पुण्यावरून येणार होते. नियोजनातील पहिलाच गड आज सर करायची उत्सुकता प्रचंड असल्याने मी गाडी अगदी सुसाट चालवत होतो. वेळेत पोहोचायचे देखील होते. तरीही ठरल्याप्रमाणे पोहोचायला मला २० मिनिटे उशीर झालाच. सगळे पोहोचले होते. अजित आणि निखिल सोबत त्यांचे पुण्यातले दोन मित्रही आले होते. म्हणजे आम्ही एकूण ७ जण झालो होतो. फोटो काढण्यासाठी मी माझा DSLR आणलेला पाहून सगळेजण एकदम खुश झाले. सगळ्यांची गळाभेट करून आम्ही तोरण्याच्या दिशेने निघालो. सगळ्यांचा उत्साह पाहून "वेडात मराठे वीर दौडले सात" असाच अनुभव क्षणभर आला. सगळे माझ्या अगोदर आल्याने त्यांचा चहा पाणी झाला होता, मी मात्र उशिरा आल्याने मला चहा न घेताच तसंच थंडीनं कुडकुडत पुढे निघावं लागलं.
आता आम्हाला सर्वात पहिले वेल्हे गावात पोहोचायचं होत. जे गडाच्या पायथ्याला आहे. वेल्हे गाव तालुक्याचं ठिकाण असल्यानं तिकडे जाणारा रस्ता चांगला आहे. रस्त्याने जाताना डाव्या हाताला कानंद नदीचं खोर दिसतं. त्याच्यापलीकडे नसरापूर पासून सुरु झालेली एक डोंगररांग अगदी तोरणा गडापर्यंत एकसलग जाऊन पोहोचते. पाच दहा किलोमीटर दुरूनच नजरेला तोरणा गड दिसू लागतो. आणि तो एकदा दिसायला लागला कि कधी एकदा तिथे पोहोचू असे होते.
साधारण ८ वाजताच्या दरम्यान आम्ही वेल्हे गावात पोहोचलो. कुणीच काही खाऊन आलेलं नसल्याने थोडस खाऊन मग गड चढायला सुरुवात करायची असे ठरले. सगळ्यांनी भक्कम नाष्टा केला आणि आम्ही पुढे निघालो. गडाचा पहिला टप्पा गाडीवरच पूर्ण होतो. गावातून पार्किंग पर्यंतचा रस्ता सुरुवातीला थोडासा सोडला तर सगळा सिमेंटचाच आहे. पण एकावेळी एकच गाडी जाऊ शकेल एव्हढा अरुंद, त्यामुळे चारचाकी घेऊन जाणार असाल तर काळजी घ्या. पार्किंगला गाड्या लावून सगळ्यांनी थोडा वेळ फोटोसेशन केलं आणि आम्ही गडाकडे वळलो. समोर गड पाहिला तो तिथूनच एव्हढा मोठ्ठा दिसला आणि छातीत धस्सच झालं. काही क्षण डोळे मिटले आणि जरा इतिहासात डोकावलं. आणि शिवाजी नावाचं एव्हढस लेकरू वयाच्या १६ व्या वर्षी हा गड चढतंय असं चित्रच समोर उभं राहील आणि ऊर्जेची एकलहर अंगभर चमकून गेली. आणि सुरु झाला तोरणाच्या चढणीचा प्रवास.
वेल्हे गावापासून किल्यावर जाईपर्यंत चढणीचे तीन टप्पे पडतात पहिला गावापासून पार्किंग पर्यंतचा जो आम्ही गाडीवरच पूर्ण केला. दुसरा पार्किंग पासून कठीण चढणीपर्यंतचा, आणि तिसरा कठीण चढणीपासून वर गडावर पोहोचेपर्यंतचा. ९ वाजून गेले होते तरी थंडी अजूनही जाणवत होती. तिचा फायदाही होत होता कारण चालून कुणी म्हणावं तेव्हढं दमत न्हवतं. दुसरा टप्पा चढून जायला साधारण अर्धा तास लागला. तिथून कानंद नदीचं खोर आणि नदीवर असलेल्या गुंजवणी धरणाच्या पाणीसाठ्याचं दृश्य अगदी विलोभनीय असं दिसत. जरा वेळ तिथे विश्रांती घेऊन फोटो वगैरे काढून आम्ही पुढे निघालो.
आता आमचे खरे कसब पणाला लागणार होते कारण आता खरा चढणीचा अवघड प्रवास आम्ही करणार होतो. अगदी हा टप्पा सुरु झाल्यापासून कधी डावीकडे तर कधी उजवीकडे आधारासाठी रेलिंग असल्याने चालताना विशेष कसरत करावी लागत न्हवती.
मधेच पाणी पिण्यासाठी काही क्षण थांबून आम्ही आमची वाटचाल चालूच ठेवली. जसजसे आम्ही वर चढू लागलो तसतसे किल्ल्याला लाभलेल्या कातळ कड्याची भव्यता जाणवू लागली. आता बिनीचा दरवाजा नजरेच्या टप्प्यात आला. जराशी सपाट पायवाट चालून संपली कि या दरवाज्यापाशी पोहोचण्यासाठी परत एकदा कंबर कसावीच लागते. तिथेच एका खडकावर काही माकडांची पिल्ले अगदी सहजतेने उभ्या खडकावर वर-खाली करतायेत हे पाहून मला त्यांचं भलतंच कौतुक वाटलं. मग बाकी एका दमात हि चढण चढून जायचं असा मी निर्धारच केला आणि एका हातात कॅमेरा पकडून मी झप-झप एका दमात ती चढण चढून पहिल्या दरवाजात येऊन पोहोचलो.
बिनीचा दरवाजा
तसा आकारमानाने हा दरवाजा लहान आहे. पहारेकऱयांसाठीच्या देवड्या, लाकडी दरवाजा लावण्यासाठीच्या दगडी खोबण्या, दगडी महिरपी कमान अशी एकंदरीत दरवाजाची रचना होती. दरवाजाच्या वर जाण्यासाठी डाव्या बाजूने पायऱ्यादेखील आहेत. पण त्या मार्गावर माकडे जास्त असल्याने मी काही तिकडे जाण्याचं धारिष्ट्य केलं नाही कारण, एका जोडप्याच्या हातातील पाण्याची बाटली काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने माकडाने पळवून नेलेली मी पाहिली होती. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही जाल तेव्हा जरा जपूनच. आता इथून पुढे कमी जास्त उंचीच्या पायऱ्या होत्या. त्यामुळं आपसूकच कसरत कमी होणार होती. बिनीच्या दरवाजातूनच वर पाहिल्यास गडाच्या मुख्य कोठी दरवाजाचे दर्शन होते.कोठी दरवाजा
एकंदरीत या महादरवाज्याच्या आकारमानावरून हा गडाचा मुख्य दरवाजा असावा असा अंदाज बांधता येतो. दरवाजाची रचना गोमुखी आकाराची आहे. म्हणजे गायीने तिचे तोंड जर तिच्या पोटाकडे वळविले तर त्यावेळी तिच्या मानेचा जो आकार बनेल अशा आकाराची रचना. दरवाजाचे दगडी बांधकाम आजही भक्कम आहे. गरजेच्या ठिकाणी संवर्धनाचं काम झाल्याने बिनीच्या दरवाजापेक्षा हा दरवाजा सुस्थितीत आणि देखणा आहे. तिथल्या वातावरणात जरासं एकरूप व्हायचा प्रयत्न केला. तर कोठी दरवाजाच्या डागडुजीवेळी मावळ्यांना सापडलेला धनाचा साठा आणि मावळ्यांना झालेला आनंद याच चित्र समोर दिसू लागलं. हो खरंच तुम्ही सुद्धा अनुभवू शकता फक्त एकरूप होता आलं पाहिजे. थोडा वेळ बसून आता आम्ही पुढे निघालो. दरवाज्याच्या उजव्या बाजूच्या तटबंदीने पुढे गेलो तर मेंगाई मातेचं मंदिर आणि पुढे कोकण दरवाजामार्गे बुधला माचीकडे जाता येते. आम्ही डाव्या बाजूने पहिल्यांदा झुंजार माचीकडे जाण्याचे ठरविले. पुढे किल्ल्याच्या संवर्धनासाठी तयार केल्या जाणाऱ्या चुन्याची भट्टी दिसली. भट्टीला वळसा घालून आम्ही डावीकडे असलेल्या खोकड टाक्याकडे वळलो. मला तर हे टाके टाक्यापेक्षा तळेच जास्त वाटले. गौरव ने सांगितले, हे पाणी पिण्यायोग्य आहे मग मी आणि गौरव पाणी पिण्यासाठी खाली उतरलो. पाण्यात हात घातला तर पाणी फ्रीजमधल्या पाण्यापेक्षाही थंड होते ओंजळीने पोटभरून पाणी प्यायलो. आणि रिकाम्या झालेल्या बाटल्याही भरून घेतल्या. फोटोसेशन चालूच होते सगळ्यांचे. तिथून वर चढून आम्ही तटबंदीवर आलो. आणि समोर बघितले तर समोर दिसत असलेले कानंद नदीचे खोरे मघापेक्षाही विलोभनीय वाटले. तटबंदीवरुन चालत चालत आम्ही सदरेच्या जागेपर्यंत येऊन पोहोचलो. तिथे भल्या मोठ्या ध्वजस्तंभावर भारतीय तिरंगा डौलाने फडकत होता. २६ जानेवारी असूनही वेळेअभावी सकाळी ध्वजवंदनाला जाऊ न शकल्याचं शल्य मनात तर होतंच पण तेही इथं पूर्ण झालं. ध्वजाला वंदन करून आम्ही झुंझार माचीला जाण्यासाठी शिडीने खाली उतरू लागलो.झुंजार माची
या माचीवर जाण्यासाठी उतरताना उतरणीशी निकराची अशी झुंजच द्यावी लागते. पहिली उतरण शिडी असल्याने उतरता येते, पुढे थोडे सपाट चालून छोट्या भुयारानंतर अतिशय कठीण अशी उतरण आहे. मला वाटतं फक्त या अतिधोक्याच्या उतरणीमुळे बर्याच जणांना झुंजार माचीवर जाण्याच्या आनंदाला मुकावं लागत असणार. संवर्धनाच्या कामात ह्या वाटेचे जर काम झाले तर आणखी बरे होईल. माचीच्या डाव्या तटबंदीने आम्ही बुरुजावर पोहोचलो. या बुरुजावरून डावीकडचा कानंद नदीचा आणि उजवीकडचा राजगडाकडे जाणाऱ्या डोंगररांगेचा प्रदेश दिसतो. थोडा वेळ बसून अभिने त्याच्या भक्कम आवाजात "गारद" दिली. गारदेतला एकेक शब्द ऐकून शहारून येत होतं. या माचीच्या बुरुजाला एक छोटा बुरुज आहे, तो पाहण्यासाठी आपल्याला बुरुजावरून खाली उतरून जावं लागत. झुंजार माचीच्या दोन्ही बाजूच्या तटबंदीच्या मधोमध पहारेकाऱयांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाण्याचे टाके आहे. तटबंदीला दोन्ही बाजूला खाली उतरण्यासाठी छोटे दरवाजे आहेत. तटबंदीतली शौचकुपाची रचना देखील इथे पहायला मिळते. तटबंदी अजूनही भक्कम आहे. या माचीवरून दूरवर बुधला माची दिसते. आणि ते पाहून मग मात्र मन तिकडे ओढ घेऊ लागत. झुंजार माचीवर केलेली येतानाची कसरत परत वर जाताना सोपी वाटली. उतरताना खोली दिसत असते त्यामुळं भीती वाटणं साहजिकच, पण परत चढताना खोली दिसत नसल्याने भीतीचे काही वाटत नाही. पुन्हा ध्वजस्तंभापाशी येऊन तसेच डाव्या बाजूने आम्ही बुद्धाला माचीकडे तटबंदीवरूनच चालत निघालो.जाताना उजव्या हाताला सदरेची जागा, जीर्णोद्धार झालेली नवी इमारत दिसते. पुढे गडाखालून बांधकामाचे घडीव दगड आणलेले दिसले. जे रोप वे च्या साहाय्याने वर आणले जातात. तिथेच आम्हाला काही युवक काहीतरी गोळा करताना दिसले. विचारपूस केली असता, आम्ही पुण्यावरून आलोय आणि आम्ही सुट्टीच्या दिवशी गड किल्ल्यावर फिरून इथे पडलेला कचरा गोळा करत असतो, असे त्यांनी सांगितले. थोडा वेळ त्यांच्याशी बोलून त्यांचं कौतुक करून आम्ही जय शिवराय बोलून त्यांचा निरोप घेतला. खूप छान वाटलं त्यांना भेटून. तिथून पुढे निघाल्यावर आपल्याला दिसते ते पाण्याचे महार टाके.
महार टाके
गडावर पाण्याची लहान मोठी बरीच टाकी आहेत त्यापैकी एक महार टाके. यातले पाणी अगदी नितळ दिसत होते. पण त्यात शेवाळाचे प्रमाण जास्त असल्याने त्याला हिरव्या रंगाची छटा दिसत होती. येथील खडकाला कोरीव खोदकाम करून हे टाके बनविले असावे असे त्याची एकंदरीत रचना पाहून अंदाज बांधता येतो.महार टाक्याच्या वरच्या बाजूला आई मेंगाई देवीचे मंदिर आहे पण बुधला माचीवर जाऊन आल्यावरच मंदिर पहायचे असे आम्ही ठरवले आणि आम्ही कोंकण दरवाजाकडे निघालो.
कोकण दरवाजा
हा दरवाजा गडावरील सर्वात प्रशस्थ आणि सुंदर असा दरवाजा. या दरवाजाच्या बुरुजावरील चौथरा खूप मोठा आहे. या दरवाजाच्या बुरुजावरून समोर हत्ती नाळ आणि त्यापलीकडचा बुधला माचीपर्यंतचा सगळा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. या दरवाजाची रचनाही गोमुखी आकाराची होती म्हणजेच याला गडाच्या स्वरंक्षणाच्या दृष्टीने खूप महत्व असावे. या दरवाजापाशी एक आजी पाण्याच्या बाटल्या आणि काही खाद्यपदार्थ विकायला बसलेल्या दिसल्या. सहज चौकशी केली तर त्यांनी सांगितले कि आम्ही तर दररोज गड चढून येतो. हे ऐकून मी त्यांना त्यांचं वय विचारलं तर " आमचं वय व्हय, हाय ७०-७५." मला तर अचंबाच वाटला. आणि विशेष म्हणजे त्या दररोज बुधला माचीकडच्या रडतोंडी बुरुजावरून येतात. हा बुरुज म्हणजे भले भले या बुरुजावरून चढून येताना रडकुंडीला येतात म्हणूनच याच नाव रडतोंडी बुरुज ठेवलं असावं.हत्ती नाळ
या बुरुजाला हत्ती नाळ का म्हणत असावेत हे बुरुजावर असताना तुमच्या लक्षात येणार नाही त्यासाठी तुम्हाला हा बुरुज उतरून बुधला माचीकडे चालत जाताना माघारी जाताना मागे परत वळून पाहावे लागेल. एक अजस्त्र हत्ती तुमच्या समोर उभा असल्याचा भास तुम्हाला होतो. हत्तीसारख्या आकाराचा दिसत असल्याने त्याला हत्ती नाळ असं म्हणत असावेत.पुढे बुधला माचीकडे जाताना एका अवघड कड्याच्या बाजूने जावे लागते. एकीकडे उंच भलामोठा खडक आणि दुसरीकडे खोल दरी असा हा भाग. आमच्यातला एक जण त्यामुळे पुढे आलाच नाही. तुम्ही जाऊन या, मी थांबतो इथे असं तो म्हटल्यावर त्याच्याकडे आमच्या सॅक ठेवून आम्ही मोकळ्या अंगाने पुढे झपझप पावले टाकत निघालो. पुढे डाव्या बाजूच्या बुरुजाशेजारी पाण्याचे टाके लागते तिथे काहीजण न्याहारी करत होते. ते पाहून मात्र भुकेची जाणीव तीव्र व्हायला लागली. पण माघारी जाऊन मेंगाई देवीच्या दर्शनानंतरच जेवायचं असं ठरवून आम्ही पुढे निघालो. बुधला माचीवरचा शेवटचा बुरुज सुस्थितीत नाही. त्यामानाने रडतोंडी बुरुज उत्तम स्थितीत आहे. इथून तुम्हाला राजगड कडे जाणारा डोंगररांगेवरचा पायवाटेचा रस्ता दिसतो आणि समोर राजगडही. या बुरुजावरून उजव्या बाजूला वळून पुढे चिलखत बुरुज, चित्त दरवाजा, वकंजाई दरवाजा, चिणला दरवाजा करत तुम्ही परत हत्ती नाळेपर्यंत गेल्या मार्गाने परत येता. पावासाळ्यात या माचीवर जाणे धोक्याचे असावे, कारण रस्ता पाण्याने घसरडा होत असावा असा अंदाज बांधता येतो.
मागेच थांबलेल्या मित्रापाशी आम्ही परत पोहोचलो आणि पाणी पिऊन, बिस्कीट खाऊन आम्ही परत कोंकण दरवाजाकडे निघालो. दरवाजा चढून वर आल्यावर पुढे मंदिर दिसले आणि हायसं वाटलं कारण सकाळपासून आम्ही फक्त नाष्ट्यावरच होतो आणि आता संध्याकाळचे ५ वाजायला आले होते. मेंगाई देवी मंदिराच्या समोर महादेवाचे मंदिर आहे आणि त्याच्यासमोर दोन चार सतीशिळा आहेत. पण तेथे फलक वगैरे नसल्याने कुणाच्या हे कळू शकले नाही. बूट काढून मेंगाई देवीचे दर्शन घेतले आणि मंदिराबाहेरच्या ओट्यावर आम्ही सगळेजण जेवायला बसलो. मुक्कामी यायचं झाल्यास इथे मंदिरात १५-२० लोक राहू शकतील एव्हडी जागा आहे. सगळे डबे मोकळे करून जरा वेळ तिथेच लवंडून जरासा आराम केला. एव्हडं छान वाटत होत कि माघारी फिरायची इच्छाच होत न्हवती. तरीही जड पावलाने आणि जड अंतःकरणाने सगळं साहित्य घेऊन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. पहिला टप्पा उतरून आल्यावर माघारी पाहून परत एकदा गड डोळ्यात साठवून घेतला, परत भेटीला यायचं गडाला वचन दिलं आणि आम्ही माघारी फिरलो.
https://www.youtube.com/watch?v=6bhHxW6WNNY