Friday, 18 January 2019

" प्रतापगड " .. पुण्यातही...?

" प्रतापगड " ..  पुण्यातही...? 


  

सकाळी सकाळी मावसबंधूंचा फोन आला. त्यांनी फोनवर मला सांगितलं, अरे प्रतापगड पुण्यात आलाय. मी जरा प्रश्नार्थक नजरेने विचारलं, कसं शक्यय? पुण्यात यायला. मला काही कळेचना. तरीही आपल्या वाक्यावर ठाम रहात त्यांनी परत त्यांच्याच वाक्याला दुजोरा देत म्हटले, “अरे हो, खरंच प्रतापगड पुण्यात आलाय.” तुला पहायचाय का? आता बाकी उत्सुकता वाढू लागली आणि मी लगेच होकार दिला. मग त्यांनी मला ठिकाण आणि ज्या अवलियाने प्रतापगड पुण्यात आणलाय त्यांचा नंबर दिला. रविवारी मी प्रतापगड पाहायला नक्की जाणार असा शब्द देऊन मी फोन ठेवला. 


        मात्र फोन ठेवल्याबरोबरच विचारचक्र सुरु झालं आणि मन थोडं इतिहासात डोकावू लागलं. “भोरप्या डोंगर” जो ‘मोरोपंत पिंगळे’ आणि ‘हिरोजी इंदलकर’ या शिवरायांच्या प्रधानांनी अवघ्या दोन वर्षात बांधून जावळीच्या खोर्यावर पहारेकरीच उभा केला आणि याच प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून मोठा प्रताप केला आणि भोरप्याचा "प्रतापगड" झाला. बंधूंनी सांगितलेला नक्की काय प्रकार आहे, हे जाणून घेण्यासाठी माझं मन हैराण होऊ लागलं. रविवारची वाट मी अगदी उत्कंठतेने पाहू लागलो. आणि अखेर तो दिवस आला. रविवारी दुपारपर्यंतचं एक काम उरकून मग त्या ठिकाणी जायचं असं ठरलं. सोबत राहुल हि असणार होता. दुपारी २ वाजता काम उरकून आम्ही त्याठिकाणाकडे जायला निघालो. दुचाकीमूळे  आम्हाला गाड्या बदलत जावे लागणार न्हवते. हिवाळ्याचे दिवस असल्याने भरदुपार असूनही ऊन काही जाणवलं नाही. सांगवीमधून प्रथम वाकड आणि मग पुढे माण रोड वरून ठरलेल्या नियोजित ठिकाणी आम्ही जाणार होतो. सुट्टीचा दिवस असूनही रस्त्याला गर्दी एव्हडी विशेष जाणवली नाही. वाकड उड्डाणपूल पार करून फेज १ च्या एकतर्फी रस्त्याने आम्ही माण रोडला पोहोचलो, उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. फेज १ पासून साधारण ५ मिनिटांच्या अंतरावर, उजव्या हाताला आम्हाला भगवं निशाण फडकताना दिसलं आणि आपण एव्हड्या कमी वेळात इथवर पोहोचल्याच्या विचाराने जीव भांड्यात पडला. जसे-जसे जवळ जाईल तसे तसे जाणवायला लागले आज जे काही आपण पाहणार आहोत हे अद्भुत असणार आहे. रस्त्यालगतच २.५ एकर क्षेत्रामध्ये हे सगळं उभं दिसत होतं. सुरुवातीलाच भव्य असं प्रवेशद्वार आणि त्याच्या दोहो बाजूला मांडलेल्या दोन तोफा आमच्या स्वागतासाठी उभ्या असल्यासारख्या भासल्या.









कमानीतून पुढे आत गेल्यावर समोर जे काही दिसलं ते अगदी अदभूत होत. खरंच हो, समोर “प्रतापगड” होता. आणि तोही डोळ्याचे पारणे फेडण्याएव्हढा भव्य. पटांगणाच्या उजव्या बाजूला गाडी पार्क करून, ज्याने हे सगळं बनवलंय त्या अवलियाच्या तिथेच असलेल्या निवासाकडे आम्ही वळलो. तिथे काही लोक आपल्या कामात व्यस्त होती. आम्ही जवळ जाऊन धनंजय बर्वे आहेत का? असं विचारताच होकारार्थी मान डोलावत त्यांच्यामधून एक माध्यम उंचीचा माणूस पुढे आला. हो मीच धनंजय बर्वे. आम्ही आमचा परिचय सांगून माझ्या मावसबंधूंचं नाव सांगितलं, तशी आनंदाची एक लकेर त्यांच्या चेहर्यावर मला जाणवली. बहुदा माझ्या बंधूंनी माझी ओळख त्यांना फोनवरच करून दिलेली असावी, असे वाटून गेले. प्रथम तर आम्ही या संकल्पनेविषयी त्यांच्याशी चर्चा केली. सर्व काही सांगतानाचा या माणसाचा उत्साह जबरदस्त होता. सुचलेली कल्पना आणि सत्यात उतरलेला किल्ला इथपर्यंतचा सर्व प्रवास त्यांनी आमच्यासमोर मांडला. मदत करणारांची नावे ते अगदी भारावून सांगत होते. स्वतःच घर नसलेला माणूस हे असलं मोठं धाडस करतो, याला वाघाचंच काळीज असावं लागतं. शिवविचाराने प्रभावित झालेला माणूस काय करू शकतो याच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धनंजय बर्वे". भौतिक सुखाच्या मागे वेड्यागत धावत सुटलेल्या माणसांना इतिहासात, गड किल्ल्यात रस राहिलाय कुठे, वेळेअभावी नाही जाता येत किल्ल्यांवर म्हणून मी किल्ला त्यांच्याकडे घेऊन आलोय." या एका वाक्याने या संकल्पनेमागची कारणमीमांसाच स्पष्ट झाली. तासभर त्यांच्याशी गप्पा मारल्यावर आम्ही आता प्रतापगड पाहायला जाऊया, असं ठरवून त्या भव्य कलाकृतीकडे निघालो. तर बर्वे सुद्धा आमच्यासोबत गड दाखवण्यासाठी म्हणून मोठ्या उत्साहाने आमच्यासोबत निघाले.


सुरुवातीलाच छोटेखानी तिकीट घर आहे, तिथे बर्वेंच्या आई बसल्या होत्या. बर्वेंनी यांचे तिकीट घेऊ नको असे त्यांना सांगितलं, पण मलाच ते बरं वाटणार नसल्याने मी स्वतः १०० रुपये काउंटरवर ठेवून दोन तिकिटे घेतली. तिकीटघरापासून पुढे छोटीशी कमान आहे. त्या कमानीतून आत गेल्यावर किल्ला नजरेत येतो. मूळच्या प्रतापगडाच्या बालेकिल्ल्याच्या खाली जशी गाड्या पार्क करण्यासाठी जागा आहे, तशीच इथेही आहे. त्यामुळे आपण मूळच्या प्रतापगडीच आहोत कि काय असे वाटते. प्रतिकृतीसमोर मात्र आपण स्वतः खुजे दिसू लागतो एव्हढी ती भव्य आहे. बालेकिल्ल्याच्या डाव्या बाजूने पुढे चालत गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या पायर्या लागतात. पायऱयांवर पाय ठेवताना त्यांच्या मजबूतीविषयी थोडा साशंक होतो, पण बर्वेंनी पुढे होऊन त्यावर अक्षरश: उड्या मारून दाखवल्या. मग मात्र आमची खात्री पटली आणि आम्हीही पायऱ्या चढायला सुरुवात केली. समोर महादरवाजा दिसू लागला अगदी हुबेहूब रचना केलेला. दरवाजाच्या आतमध्ये पहारेकऱयांसाठीच्या जागा आहेत. त्याला "देवड्या" असं म्हणतात. यात एका बाजूला अफजलखानाच्या वधाचे तर दुसऱ्या बाजूला राज्याभिषेकाचे सुंदर चित्र लावलेले आहे. प्रवेश करून समोर पाहिल्यावर टेहळणी बुरुज दिसतो. आणि एकंदरीत आपण प्रतापगडी असल्यासारखाच भास होतो. बुरुजावरील फडकत्या भगव्याकडे पाहून तर स्फुरणंच चढते. बुरुजाला शस्त्रूवर हल्ला चढवण्यासाठीच्या घळई सुद्धा दाखवल्या आहेत. पुढे चालत जाऊन आम्ही टेहळणी बुरुजावर पायऱयांनी चढलो. बुरुजावर सहज गोलाकृती फिरता येईल एव्हढी जागा आहे. बुरुजावरून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. आणि दूर असलेली शिवरायांची अश्वारूढ मूर्ती नजरेस पडते. आणि पाय तिकडे ओढ घेऊ लागतात.
 या ब्लॉग ला तुम्ही व्हिडीओ स्वरूपात पण पाहू शकता



टेहळणी बुरुजाला संरक्षण म्हणून छोट्या संरक्षक बुरुजाची रचना जशी प्रतापगडी आहे अगदी तशीच इथेही आहे. एक माणूस त्यातून आरामशीर फिरू शकेल एव्हढी जागा आहे. त्या छोट्या बुरुजाने मोठ्या बुरुजाला वळसा घालत आम्ही पुन्हा दरवाजाकडे जाणार तेव्हड्यात तिथे बुरुजाला खिडकीसारखी रचना असलेली जागा मला दिसली. ती नक्की कशासाठी असावी? याचा मी विचार करायला लागलो, पण काही अंदाज बांधता येईना. न राहावून शेवटी बर्वेंना मी त्याबद्दल विचारले असता, त्यांनी आम्हाला सांगितले कि, पूर्वी गडावर शौचकूप असायचे त्याची हि रचना इथे केली आहे. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बर्वेंनी इथे साकारल्या आहेत. तिथून पुढे निघून समोर आम्हाला दोन रस्ते दोन बाजूला जाताना दिसले पण दिशादर्शक फलक असल्याने आमचा गोंधळ उडाला नाही फलकावर दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही पुढे निघालो. डाव्या बाजूने आम्ही आता वर भवानी मातेच्या मंदिराकडे जाणार होतो. वर मंदीर आहे समजताच आम्ही आमच्या चपला तिथेच काढून पुढे पायऱ्या चढायला सुरुवात केल्या. मोठाल्या ८-१० पायऱ्या चढल्यावर डाव्या बाजूला आई भवानी मातेचं मंदिर दिसलं. आणि गंडकी नदीतील पाषाणापासून बनवलेली प्रतापगडावरची मूळ भवानीआईची मूर्ती समोर दिसायला लागली अगदी हुबेहूब. आई समोर माथा टेकून "कलाकाराच्या हाताला यश दे", असं मागणं मागून मी उभा राहिलो. राहुलनेही आई भवानीमातेचे दर्शन घेतले. तिथून डावीकडे पाहिल्यावर सपाट भूभाग बनवल्यासारखा दिसला. माझी उत्सुक नजर बर्वेंनी बरोबर हेरली आणि ते सांगू लागले, कि इकडे पुढे शंकराचे मंदीर मूळ प्रतापगडी आहे. पण जागेअभावी आपल्याला ते करता नाही आले. तरीही थोडीशी शक्कल लढवून जागेच्या प्रश्नावर मात करत ते आपण बनवलंय. कुठे? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यासाठी आपल्याला गड उतरून खाली जावे लागेल असे सांगितले. पण त्याआधी उरलेला गड पाहण्यासाठी आम्ही उजव्या बाजूने पुढे निघालो.












पुढे गडाचे मुख्य आकर्षण असणार होते ते म्हणजे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा. थोडे पुढे गेल्यावर चौथर्यावर उभा केलेला पुतळा आम्हास दिसला. आम्हा तिघांकडूनही राजेंना मुजरा घातला गेला. राजांची ती मूर्ती पाहून अंगभर रोमांचच उभे राहिले. बराच वेळ तिजकडे पाहिल्यावर आम्ही माघारी फिरलो. नुकताच सूर्य मावळतीकडे झुकलेला दिसला. उंच ठिकाणी असल्याने सूर्य आणि आमच्या मध्ये बुरुजावरील भगवा येत होता. सूर्यापुढे त्याचे तेज तसूभरही कमी होत न्हवते. आणि म्हणूनच कि काय, सूर्यानेही आता आकाशात भगव्या रंगाची उधळण केली होती. हे सगळं दृश्य आणि वातावरण पाहून मन अगदी भारावून गेलं. तिथूनच सर्व गड पुन्हा एकदा नजरेत सामावून घेतला आणि पुन्हा चपला घालून आम्ही गड उतरायला लागलो.

गडाच्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर लागलीच उजव्या बाजूला जागेच्या प्रश्नावर मात कशी केली हे पहायला मिळणार होतं. तिथे चक्क भुयार बनवलेलं आम्हाला दिसलं. आम्ही वाकून आतमध्ये जायला निघालो. उजेडातून एकदम अंधारात आल्यामुळे आम्हाला जरा अंधारल्यासारखं झालं, पण काही वेळातच आतमध्ये असलेल्या प्रकाशदिव्याच्या मंद उजेडाने सर्व काही दिसू लागलं. थोडं पुढं गेल्यावर भुयाराच्या भिंतीला एका हाताच्या पंजाएव्हढे छिद्र दिसले. त्यातून आत पाहिलं तर शंभू महादेवाची पिंड आणि त्यावर पहारा देणारे नागराज नजरेस पडले. त्यावर वेगवेगळ्या रंगाचे दिवे रंगांची उधळण करत असल्याने त्या नजाऱ्याला एक भलतीच रंगत आली होती. तिथून पुढे आतमध्ये महालक्ष्मी देवीचीही मंदिर अगदी तसेच दाखवले होते. जागेचा अगदी पुरेपूर वापर केलेला दिसत होता. चालताना किल्ल्याच्या बांधणीसाठी रचलेले लोखंडी पाईप पायात येत होते. त्यामुळे खालीही लक्ष ठेवावं लागत होत. पुढे काही ठिकाणी, शिवरायांच्या जीवनात घडलेल्या महत्वाच्या प्रसंगांची चित्रे लावली होती. ते पाहून आम्ही अगदी इतिहासात रमून गेलो होतो. आपसूकच प्रत्येक चित्रावर राहुल आणि माझी चर्चा होत होती. भुयारी मार्गातही लपण्याच्या जागा बनवलेल्या असायच्या त्याचंही प्रात्यक्षिक बर्वेंनी आम्हाला दाखवलं. पाण्यासाठी भिंतींना आडवी छिद्रे कशी केली जायची हेही त्यांनी त्या भुयारात दाखविले आहे. पुढे त्या किल्ल्याची छोटी प्रतिकृती काचेमध्ये ठेवलेली आम्हाला दिसली. आता आम्ही भुयाराच्या शेवटच्या टप्प्यात आलो होतो. तिथे गणपतीचे सुरेख मंदिर बनविलेले दिसले आणि ते पाहून आम्ही हरकूनच गेलो. सुंदर मंदिर रचना, सुंदर प्रकाशरचनेने मंदिर सौन्दर्य खूपच भारी दिसत होते. गडाच्या बुरुजावरील भगव्याच्या बरोबर खाली हि मंदिर रचना केली आहे, असे आम्हाला बर्वेंनी सांगितले. गणेशाचे दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पडलो.




गडाच्या कुंपणावर महाराजांच्या स्वराज्यात असणाऱ्या सर्व किल्ल्यांची माहिती फ्लेक्स फलकांवर छापलेली दिसली. डाव्या बाजूने प्रवेश केलेले आम्ही आता गडाच्या उजव्या बाजूला आलो होतो. आता गडाची प्रदक्षिणाच पूर्ण करूया, असा विचार करून आम्ही प्रदक्षिणेसाठी निघालो. गडाच्या मागच्या बाजूला गेल्यावर पुन्हा एकदा हे काम किती भव्य आहे याची प्रचिती आली. किल्ल्यापुढे आम्ही अगदी इवलेसे दिसू लागलो होतो. किल्ला बनविण्यासाठी तयार केलेली  लोखंडी रचना बर्वेंनी आम्हाला दाखविली. ती पाहून एका वेळी २५० माणसे किल्ल्यावर उभी राहू शकतील, या वाक्याला दुजोराच मिळाला. वळसा पूर्ण करून आम्ही या कलाकृतीच्या सुरुवातीच्या छोट्या प्रवेशद्वारातून बाहेर पडलो. तिथे बर्वेंनी आम्हाला त्यांच्या आऊसाहेब, त्यांच्या भगिनी आणि बंधूंना भेटवलं. या करू घातलेल्या शिवकार्यात त्यांचाही मोलाचा सहभाग आणि साथ आहे, हे ऐकून खूप छान वाटलं. बाहेर आल्यावर आम्हाला त्यांनी स्वतः बनवलेली तोफ दाखवली. ज्याने गडावरच्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करता येते. त्याचं प्रात्यक्षिक जरी दाखवू शकत नसले, तरी प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ त्यांनी आम्हाला दाखविला. मग मात्र आमची त्या तोफेबद्दलची खात्री पटली.



" या ठिकाणी येण्यापूर्वी एव्हढं सगळं पाहायला मिळेल असं वाटलंही न्हवतं. पण अपेक्षेपेक्षा खूप काही जास्तच मिळालं. दुपारी ३ वाजता पोहोचलेलो आम्ही संध्याकाळी ७ वाजता तिथून निघालो. निघण्यापूर्वी बर्वेंचे तोंडभर कौतुक केले. त्यांची प्रेमभावनेने गळाभेटही केली. ४ तास किल्ला बघूनही पुनःपुन्हा किल्ल्याकडे लक्ष जात होते. परत एकवार किल्ल्याकडे पाहिले तो डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला, राजेंना आणि भगव्याला मनोमन मुजरा करून आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालो. हा लेखप्रपंच वाचणाराला मी एकच आवाहन करिन कि, तुम्हाला मूळ "प्रतापगडी" जायला वेळ मिळत नसेल, तर अगदी पुण्यापासून हाकेच्या अंतरावर सहकुटुंब जाता येईल, आणि भरपेट समाधान मिळेल असे ठिकाण आहे हे. मूळ ठिकाणाचा अनुभव इथे येतोच येतो. आणि ज्याने जीवाचं रान करून हे शिवकार्य उभं केलंय त्यांनाही आपल्या जाण्याने, त्यांचं कौतुक करण्याने, त्यांना प्रेरणा मिळेल आणि हे भव्य शिवकार्य पुढे जात राहील. 

"


तुम्ही जर कात्रज वरून येणार असाल तर वाकड पुलापर्यंत बस किंवा ६ चाकी टमटम मिळेल आणि तिथून पुढे माण गावाकडे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने तुम्हाला इथपर्यंत पोहोचता येईल. 
शिवाजीनगर वरून वाकड ला येण्यासाठी सुद्धा बसेस मिळतात.


खालील लिंक वर क्लीक करून तुम्ही लोकेशन गूगल मॅप मध्ये पण पाहू शकता:
https://earth.google.com/web/@18.58145114,73.724793,572.30298267a,246.2867237d,35y,31.7884886h,0.52726409t,0r?fbclid=IwAR0rFCSw0rWB95jt304wrXhvQ1yS6cqJ6HqdWOjteTsw62sAf6xRkbyb3ik


किल्ला बघण्यासाठी लागणारा वेळ :
साधारण १ तास. 

धनंजय बर्वे  यांचा संपर्क क्रमांक
+91 84129 52154

या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि असे आणखी प्रवास प्रसंग अनुभवण्यासाठी ब्लॉगला SUBSCRIBE करायला विसरू नका.





शिवरायांचा एक मावळा 
किशोर पवार 
९१५६७२०८७८

No comments:

Post a Comment

१२ महिने २४ किल्ले ! #1. गरुडाचे घरटे ! "तोरणगड" (प्रचंडगड)

१२ महिने २४ किल्ले १.  तोरणागड (प्रचंडगड) गरुडाचे घरटे  हिंदू संस्कृतीमध्ये सणवार आला कि घराभोवती आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचे त...