Saturday, 4 May 2019

माझा बा



" भाऊ "

सकाळपासून वडिलदिनाच्या पोस्टी पाहिल्या आणि नकळत १२ वर्ष जुन्या आठवणिंचे ढग दाटून आले. भाऊ, असं तुमचं अकाली जाणं आमच्यासाठी खूप दुःखदायी होत. बाप काय चीज असते, ते आज स्वतः बाप झाल्यावर कळतंय. मला अजूनही वाटतं कि बिनधास्त जगावं, उनाड जगावं, आयुष्यातले निर्णय बेदरकारपणे घ्यावेत, पण नाही घेऊ शकत कारण मला माहितीये मी बिनधास्त जगल्याने, मी उनाड वागल्याने, बेदरकारपणे निर्णय घेण्याने येणाऱ्या अडचणीला उत्तर द्यायला- ते सांभाळून घ्यायला "बाप" नाहीये.


भाऊ बघाना तुमच्या पोराने तुम्हाला हवं होत तसं सिमेंट काँक्रेटचं घर बांधलय, दुचाकी घेतलीये, घर सांभाळलंय, बहिणीचं लग्न लावून दिलंय, तुम्हाला स्वतःच्या चारचाकीत बसायचं होतं तेही होईल. सगळं काही सुरळीत चालूये भाऊ, आता तरी याल का?
या, याना तुमचा नातू तुमची वाट पाहतोय, तुमचा पोरगा तुमची वाट पाहतोय, तुमची बायको, तिचं तर काही विचारूच नका. या, आपल्या बंगल्यात राहायला, या, तुम्हाला मस्त आपल्या दुचाकीवरून दूरवर फिरवून आणतो,


मला ना तुमच्या बरोबर सेल्फी पण काढायचाय, सगळ्या पोरा-पोरींनी आपापल्या बापासोबत काढलेला फोटो बघून गहिवरायला होतय भाऊ.


एक वर्षी ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरला निघाली तेव्हा तुम्ही म्हणाला होतात कि, श्रावणबाळासारखं तू पण आम्हाला कावडीत बसवून पंढरपूर ला नेशील का? आज मी म्हणेन हो नेतो, आता तुमचे दोन दोन वाघ तैय्यार झालेत, आता तरी या. बरेच दिवस झालं मी काढलेल्या चित्रांचं तुमच्या सारखं कौतुक कुणी केलंच नाहीये, तेव्हड करायला तरी या. मला माहितीये तुम्ही नाही येणार ते. कारण तुम्ही गेला नाहीयेत तुम्हाला देवाने नेलंय, आमच्यापासून दूर. मग वडील दिनाच्या शुभेछया देऊ तर कुणाला?


तुम्ही गेल्यानंतर ती जबाबदारी ज्या माय माउलीने लीलया पेलली तिलाच आज माझ्याकडून "वडीलदिनाच्या खूप खूप शुभेच्छा".


बऱ्याचदा बघितलंय माझे मित्र त्यांच्या वडीलांवर चिडताना, खेकसताना. त्यांना वडिलांची किंमत नाहीये, असं मी म्हणणार नाही. पण नका रे असं वागूत. बरंच काही सहन केलेलं असतं त्यांनी आपल्यासाठी आणि करतही असतात.


तुम्ही जे बिनधास्त जगताना ते फक्त बापाच्याच जीवावर, मग तो बाप अंथरुणावर आजाराने खिळलेला असला तरीही. त्यांना प्रेम द्या, त्यांची स्वप्न पुरी कशी करता येतील यासाठी झटा. बघा आयुष्य किती सुखाने भरून जाईन. कधीतरी प्रेमाने त्यांच्याशी बोला. त्यांनीच घेऊन दिलेल्या मोबाईल मध्ये त्यांच्या सोबत एखादा सेल्फी काढा बघा बाप काय खूष होतो ते. याच्या पलीकडे आनंदाची व्याख्या ती काय. हे एक बापच तुम्हाला सांगतोय.
आपलाच,
किशोर पवार

7 comments:

  1. मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा तु एक कलाकार आहेस. भाऊंना हे नवीन रूप फार आवडल असत

    ReplyDelete
  2. मनाला भिडणारा लेख
    उन्हाळ्यात ढग दाटले डोळ्यात
    Hats ऑफ

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख वाचून खरंच डोळ्यात पाणी आलं

    ReplyDelete
  4. Kishor Pawar, tuji Lekhan Shaili Hi Vakhannyajogi ahae.

    Asech uttam lekh Lihit ja

    ReplyDelete
  5. अप्रतिम आणि काळजाला भिडणारा लेख लिहिलंयस it's a real story

    ReplyDelete

१२ महिने २४ किल्ले ! #1. गरुडाचे घरटे ! "तोरणगड" (प्रचंडगड)

१२ महिने २४ किल्ले १.  तोरणागड (प्रचंडगड) गरुडाचे घरटे  हिंदू संस्कृतीमध्ये सणवार आला कि घराभोवती आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचे त...