Tuesday, 28 March 2017

एक तारीवाले बाबा

"एक तारी वाजावता वाजवता आविष्य एक तारवरची कसरत कस बनलं कळलंच न्हाय बघ बाळा. ल्योक व्हता दारूच्या नशेत बुडला आणि बायका पोरांच्या आविष्यात अंधार पडला. आमच्या आविष्याचा कणा आसा दारू मूळ कुजल ह्याची कल्पनाच न्हवती केली, काय करणार वाजवतोय आता एक तारी आणि करतोय इठोबाचा नामजप. आता ही एकतारीच माझी वारी आणि हीच माझा हरी." हातात घेतलेल्या कपातील चहावर साय येईपर्यंत हे एकतारीवाले बाबा एव्हडं सगळं बोलून गेले आणि माझ्या मनावर विचारांच्या साय चे प्रचंड ढगच दाटून आले.



माझी आई सांगत असते दारात आलेली व्यक्ती तीच दुःख आपल्या दारावर सांडून-मांडून गेली तरी चालेल पण दुःखी होऊन नाही गेली पाहिजे. खूप दुःखाने भरलंय जग, काहीच नसलेल्याकडे दुःख तर आहेच पण जगायला लागणार सगळं काही असूनही काही लोक दुःखी आहेत. याला अंत नाही. फक्त एव्हडं प्रचंड दुःख घेऊन जीवनाच्या प्रवासावर निघालेल्या जीवांना कुठेतरी सुखाची सावली मिळावी असं वाटत. बाबा माझ्याकडे पहात असताना माझ्या लक्षात आले कि, त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलंय.



मग मी बोललो "बाबा, तुमचं आयुष्य एक तारी वाजविण्यात गेलं, पण तुमच्या नातवांच्या हातात शिक्षणाची दोरी द्या. कधीही शिक्षणासाठी कशाची गरज लागली तर माझ्या घराचा दरवाजा विसरू नका. नक्कीच मोकळ्या हाती जाऊ देणार नाही मी तुम्हाला." असं ऐकल्याबरोबर चेहरा खुलला त्या बाबांचा. शाब्दिक तरी आधार मिळाल्याची ती खूण असावी. आईने धान्य दिले, ते पिशवीत घेताना काय प्रचंड आशीर्वाद दिले सांगू? मन अगदी भरून आलं. एव्हडं काही त्यांच्याशी भरभरून बोलल्यावर बाबांनी खास माझ्या आई साठी तुळशीची ओवी छान सुरात त्या एक तारी सोबत म्हटली. आणि नंतर पिशवी उचलून अगदी समाधानी आणि आनंदी चेहर्याने हे बाबा चालायला लागले



मी माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना विनंती करेन कि, अशी लोकं जर कधी तुमच्या दारी आलीत तर त्यांचा रागराग करू नका, अगोदरच नियतीने त्यांच्यावर केलेला राग काही थोडा नसतो. त्यांच्याशी थोडंसं मनमोकळं बोला. कारण तुमच्या बोलल्याने खरी माणुसकी अजून जिवंत आहे याची त्यांना खात्री पटेल आणि त्यांच्या जगण्याला शाब्दिक का होईना आधार मिळेल आणि तुम्हाला मानसिक समाधान. यापेक्षा मोठी संपत्ती ती काय? धन्यवाद .

ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि असे आणखी प्रसंग अनुभवण्यासाठी ब्लॉगला SUBSCRIBE करायला विसरू नका.



आपलाच 

किशोर पवार
९१५६७२०८७८

No comments:

Post a Comment

१२ महिने २४ किल्ले ! #1. गरुडाचे घरटे ! "तोरणगड" (प्रचंडगड)

१२ महिने २४ किल्ले १.  तोरणागड (प्रचंडगड) गरुडाचे घरटे  हिंदू संस्कृतीमध्ये सणवार आला कि घराभोवती आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचे त...