"दादू, तू आपला मेंदवाच कष्ट घे, शारीरिक कष्ट तुझ्याच्याने नाय व्हनार." काल ज्वारी काढताना आमच्या आई साहेबांचे उदगार. खरंय तिचं ती लहानपणापासून नेहमी मला सांगत आली कि, आमचे दिवस मातीतच गेले तुमचे जाऊ देवू नका आणि म्हणून शाळा शिका. हा जीव तोडून सांगितलेला सल्ला ऐकत आलो आणि आज त्या शिक्षणाच्या जोरावर स्थिर स्थावर हि झालो. काल ज्वारी काढून थोडा वेळ सावलीत बसलो तेव्हा हाताकडे पाहिलं, काळे पडलेले. चेहऱ्याला ज्वारीच्या ताटांचा लागलेला काळा रंग आणि लाल झालेले हात पाहून मनात असंख्य विचार तरळून गेले. एक दिवस काम केल्याने आपल्या हाताची हि अवस्था तर मग सबंध आयुष्यभर न चुकता, कसलही कारण न सांगता, कसलीही सुट्टी न घेता, दररोज काम करणाऱ्या त्या तमाम शेतकऱ्यांचे हात कसे दिसत असतील. किती हाल सोसत असतील हा विचार करून घाबरायलाच झालं.
काल सहज उत्सुकतेपोटी बर्याच जणांचे हातही पाहिले. आणि मग कळालं कष्ट काय प्रकार आहे आणि शेती करणं किती अवघड. रात्री झोपताना आईचेहि हात हातात घेऊन पाहिले, भेगांनी भरूनही मायेचा मऊदार पणा मला जाणवला, त्या हातांवर माझे ओठ टेकले आणि खळकन आईच्या डोळ्यात पाणी तरळले. आईला बोललो ह्या तुझ्या झिजलेल्या हातांच्या कष्टाचं चीज करणार हा तुझा लेक.
पायाला पडलेल्या भेगा म्हणजे आयुष्यभराच्या कष्टाच्या खुणा स्पष्टपणे हाताला खरबरीत जाणवल्या. मग त्या भेगांना तेल लावून थोडंसं मऊ करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना माय माऊली कधी निजली मला कळलंच नाही.
"आमचं कल्चर ऍग्रीकल्चर" म्हणणं खूप सोपं आहे, पण ते जगणं खूप अवघड. कित्येक लोक असे आहेत ज्यांचे हात कधी मातीला लागत नाहीत आणि कित्येक लोकांचे हात मातीतून कधी निघतच नाहीत.


धन्यवाद
ReplyDeleteखूप छान शिकवण मिळाली 🙏🙏👍
ReplyDeleteधन्यवाद
Delete