Friday, 7 April 2017

साबण


सकाळचे साधारण ६ वाजले असावेत. नारबाला छान झोप लागली होती. तेव्हड्यात त्याच्या कानावर आईचा आवाज ऐकू येऊ लागला."नारबा ऊठ, आज गुरांकडं तुला यायचंय" आईचा आवाज नारबाला झोपेतून जागा करत, मेंदूच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत गेला.पापण्यांना किलो चे दगड बांधल्यासारखे नारबाला डोळे उघडणे अवघड झाले होते. अर्धे डोळे अगदी कष्टाने उघडून झोपेतच नारबा बोलला, "मी न्हाय येणार बा ला घेऊन जा" "उतरली न्हाय तुझ्या बा ची अजून, तूच चल" नारबाची आई बोलली. 

आता बाकी नारबाला खात्रीच पटली कि, आपल्याला आईसोबत गुरांकडं जावंच लागणार. अंगावरच बाजूला सारत, नारबा आळस देत डोळे चोळत उठला. शेजारीच झोपलेल्या लहान भाऊ आणि बहिणीकडे पाहून नारबाला ते दोघेही त्याच्या पेक्षा लहान असल्याचा खूप राग आला. छान झोपली होती दोघं. नारबा अंथरुणातून बाजूला होईपर्यंत त्याची आई रस्त्याला चालायला लागली होती. नारबाचा गुरांचा गोठा घरापासून दूर अंतरावर होता. नारबाने गाईचं दूध काढून घरी आणण्यासाठी ची उपडी करून ठेवलेली बादली उचलली आणि तसाच पारुश्या चेहर्याने गोठ्याकडे आईपासून ठराविक अंतराने चालायला लागला. गावाकडच्या सकाळच्या लगबगीचे आज नारबाला दर्शन होत होते. सूर्य त्याचा प्रकाश गावावर पांगवायला आसुसल्या सारखा वाटत होता. पक्ष्यांचा किलबीलाट अगदी स्पष्ट एेकु येत होता. सकाळी सकाळी कुत्रे आपापसात एका मागे एक धावून जणू व्यायामच करत होते. आंघोळीचे पाणी तापवणाऱ्या चुली भकाभक दूर सोडत होत्या. रात्रभर डालून ठेवलेल्या कोंबड्यांनी सोडल्या बरोबर इकडे तिकडे पळायला सुरुवात केली होती. त्यातलाच एक कोंबडा अगदी रुबाबदार दिसत होता. तो सारखा बांग देऊन जणू आपलं अधिराज्य गाजवत असल्या सारखा नारबाला भासला. हातातली बादली त्या कोंबड्याच्या दिशेने हवेतल्या हवेत भिरकावून त्याने त्या कोंबड्याला पळवून लावले. आणि विजयश्री नजरेने पुढे चालायला लागला. अंगणातला कचरा झाडून त्यावर पाणी मारत असताना मातीतून निघालेला सुगंध सकाळचे वातावरण अगदी ताजेतवाने करत होता. रस्त्यातच लागणाऱ्या शाळेच्या जवळ आल्यावर काही मुले शाळेच्या व्हरांड्यावर व्यायाम करत असल्याचे नारबाला दिसले. साधारण अंग काठीचा असल्याने नारबाचा आणि व्यायामाचा कधी दूरपर्यंत संबंधच आला न्हवता. त्याला त्या व्यायाम करणाऱ्या मुलांचे नेहमीच कौतुक वाटे. न राहावून त्याने स्वता:चे हात डोक्याकडे घेऊन दंडाची बेडकी किती फुगते याचा अंदाज घेतला. आणि त्या बेडकीकडे पाहून हसत हसत पुढे चालायला लागला. गोठ्यावर पोहोचताच नारबाच्या आईने शेणकुटाचे काम सुरु केले होते. नारबा गोठ्याजवळ पोहोचताच गाईचे सड धुण्यासाठी लागणारे पाणी समोरच्या घराच्या न्हाणीतून आणायला सांगितले. समोरच्या घराची न्हाणी बाहेर होती आणि तिथे पाण्याचा नळ होता. नारबाने आपला मोर्चा नळाकडे वळवला. बादली नळाखाली लावून त्याने नळ चालू केला, आज नळाला पाणी जरा कमी जोरानेच चालू होते. नारबा न्हाणीत इकडे तिकडे पाहू लागला न्हाणीत काही पाण्यासाठीची भांडी होती, आंघोळ केलेल्यांनि धुवायला टाकलेले कपडे होते आणि थोड्या उंचीवर भिंतीत बसवलेल्या फरशीच्या तुकड्यावर एक अंगाचा साबण ठेवलेला नारबाला दिसला. त्याने तो उचलून त्याचा वास घेऊन पाहिला खूपच सुवासिक होता तो. त्याने तो परत ठेवला आणि बादलीकडे पाहायला लागला. दररोज कपड्याच्या साबणाने अंघोळ करणाऱ्या नारबाच्या नाकातून त्या सुवासिक साबणाचा वास काही  नीघता निघेना. आपणही अशा साबणांने अंघोळ करावी असे त्याला मनोमन वाटू लागले. पण असा साबण आपल्याला घरी मिळणार नाही याची त्याला खात्री होती. सुवासिक साबणाने आंघोळीच्या कल्पनेने त्याला राहवेना. काहीही करून आपण आज सुवासिक साबणाने अंघोळ करायचीच असे त्याने ठरविले. इकडे तिकडे पाहून कुणी आपल्याकडे पाहत तर नाही ना याचा त्याने अंदाज घेतला. कुणी पाहत नाहीये याची खात्री झाल्यावर त्याने तो साबण उचलला आणि आपल्या विजारीच्या खिशात टाकला. आता त्याला न्हाणीतून बाहेर पडायची घाई करावी लागणार होती. नळ बंद केला आणि पाण्याने अर्धीच भरलेली बादली त्याने उचलली आणि परत गोठ्याकडे घाबरत घाबरत आला. नारबा पाणी घेऊन येईपर्यंत त्याच्या आईने शेण एका टोपली मध्ये भरून ठेवले होते. नारबाच्या डोक्यावर ती टोपली त्याच्या आईने उचलून दिली आणि उकिरड्यावर टाकून यायला सांगितले. एका हाताने टोपली पकडत नारबा उकिरड्याच्या दिशेने चालायला लागला, शेणाची टोपली मोडकळीस आलेली असल्याने त्यातला कोरडा कचरा डोक्यात आणि खांद्यावर सांडून शर्ट च्या आतमध्ये अंगाला लागत होता. पण आज सुवासिक साबणाने अंघोळ करायला मिळणार या एका कल्पनेनेच त्याचे लक्ष कशातच न्हवते. कचरा टाकून आल्यावर नारबा हात स्वच्छ धुवून आईसोबत गाईची धार काढायला बसला. नारबाने एक तांब्या दुधाचा काढेपर्यंत त्याच्या आईने दूधाचे चार तांबे काढले, ह्या आईच्या लकबीच नारबाला नेहमी कौतुक वाटे. धार काढून झाल्यावर गुरांना कडबा त्यांच्या दावणीत टाकून, दोघं मायलेकरे घराकडे निघाली. झपाझप पावले टाकत नारबा घराकडे निघाला. आज सुवासिक साबणाने अंघोळ म्हणजे त्याच्यासाठी आनंदाची पर्वणीच होणार होती. घरी नारबाचे वडील अजूनही झोपलेलेच होते. लहान भाऊ बहीण मात्र उठून आवराआवरी करीत होते.


घरी पोहोचताच नारबाने फर्मानच सोडले कि, "मी गुरांकडं आलो व्हतो, आता डेरीवर दूध घालायला मी जाणार न्हाय." आईनेही ते कबुल करून नारबाचा छोटा भाऊ पांडूला दूध घालायला जायला सांगितले. नारबाच्या घराची न्हाणी घरातुन बाहेर होती. नारबाला माहीत होते, पांडू दूध घालायला गेला रे गेला कि, आई स्वैपाकासाठी घरात जाईन, लहान बहीण आईला मदत करायला आतमध्ये जाईल, म्हणजे पांडू माघारी येईपर्यंत त्याला सुवासिक साबणाने मनसोक्त आंघोळ करता येणार होती. घराबाहेरच्या चुलीवर गरम करायला ठेवलेलं पाण्याचं पातेलं नारबाने उचलून न्हाणीत आणलं. नारबाची न्हाणी इतकी प्रशस्थ होती कि, आंघोळ करताना दोन्ही हात कोपरात दुमडून बोटे खांद्यावर टेकवून जर हात सरळ रेषेत वर उचलले तर, दोन्ही कोपऱ्यांना न्हाणीच्या भिंती लागत एव्हडी प्रशस्थ.




त्याने हवे तेव्हडे थंड पाणी गरम पाण्यात मिसळून अंगावर घेता येईल असे बनवले. आणि विजारीच्या खिशातून मघाशी घेतलेला साबण त्याने बाहेर काढला. कपड़े काढून तयार झाला आणि आंघोळीला त्याने सुरुवात केली. अगदी नखशिखांत, आणि सोहाळ्यासहित आंघोळ करत होता नारबा आज. लवकर उठून मोडलेल्या साखरझोपेचे दुःख कुठल्या कुठं विरून गेलं होतं. दररोज कपड्याचा साबण किंवा विना साबणाने आंघोळ करणाऱ्या नारबाने आज तीन वेळा सुवासिक साबण अंगाला लावून अंघोळ आटोपली.


आंघोळ झाल्यावर नारबाने कपडे अंगावर चढवले, आणि आता साबणाचा सुगंध येतो का ते पाहिले तर चक्क येत होता. आता त्याचे लक्ष काही गरमागरम खायला मिळते का याकडे लागले. आईने नारबाची आंघोळ होईपर्यंत गरमागरम बाजरीची भाकरी बनवून ठेवली होती. नारबा घरात शिरताच नारबाची आई बोलली, "नारबा, चल खाऊन घे आणि मंग जा बाह्येर". नारबाने होकारार्थी मान डोलावली, ताटली आणि पाण्याचा तांब्या भरून घेऊन खायला बसला
आजचा दिवस नारबासाठी एकंदरीत अगदी सुगंधिमय असाच होत होता. शाळेत जाण्याअगोदर, दुपारच्या सुट्टीत घरी आल्यावर, परत पुन्हा शाळा सुटल्यावर नारबाचे लक्ष फक्त त्या सुगंधी साबणाकडेच. रात्रीही झोपण्याआधी उद्याही आपल्याला अशी अंघोळ करायला मिळणार, या विचाराने नारबाला कधी झोप लागली त्याला कळालेच नाही
"नारबा उठेय, चल गोठयाव जायचंय, आवर पटक्यास". नारबाला झोपेत अस्पष्ट ऐकू येत होतं. त्याला वाटलं स्वप्न आहे कि काय म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. परत आणखी तसाच आवाज आला. आजही त्याची आई त्यालाच गुरांकडं चल म्हणत होती. पण वडील तर रात्री दारू पिलेच न्हवते, मग तरीही मलाच का आई चल म्हणतीये हे काही नारबाला उमजेना. अंथरुणावर पडूनच त्याने आईला नकार दिला. त्याबरोबरच त्याची आई त्याच्या जवळ आली आणि बोलली कि "आजबी तुलाच यायचंय, चल ऊठ लवकर" नारबाने आईकडे पाहिलं तर काहीतरी बिघडलय हे आईच्या चेहर्यावरील भावमुद्रेवरून नारबाच्या लक्षात आले. आता नारबापुढे काहीच पर्याय न्हवता.


नारबा बोलला, "आई तू व्हो पुढं, मी यतो मागणं
"न्हाय माझ्याबरच चल" नारबाची आई थोडंसं दमातच बोलली. मग मात्र नारबा उठला. आई त्याच्या जवळ आली आणि त्याचा हात पकडून त्याला ओढत न्हाणीकडे आली. आता मात्र नारबा बुचकळ्यात पडला. आता पुढं नक्की काय घडणार याचं गणितच नारबाला लावता येईना
न्हाणीपाशी आल्यावर त्याची आई बोलली, "नारबा त्यो साबण घे, आणि खिशात घाल"
आता मात्र नारबाची पाचावर धारण बसली. काहीतरी प्रचंड घडणार याची कल्पना नारबाला यायला लागली. आईने सोडलेल्या फर्मानाप्रमाणे नारबाने साबण उचलून खिशात घातला. आणि नारबा आईसोबत चालायला लागला.
आईच्या डोळ्यातल्या तप्त झालेल्या चक्षुभास्करासमोर नभीचा भास्कर आज नारबाला फिका वाटला. आजही पक्ष्यांचा किलबीलाट एेकु येत होता. कुत्र्यांचा धावाधावीचा व्यायाम चालूच होता. रात्रभर डालून सोडलेल्या कोंबड्या इकडून तिकडं धावत होत्या, आणि तो कोंबडा आजही त्याचा तो बांग देण्याचा कार्यक्रम चालूच होता. नारबाने मागे वळून पाहिले. तेव्हा परत त्या कोंबड्याने परत बांग दिली, आता मात्र हा कोंबडा हे आपल्याला उचकवण्यासाठी करतोय की काय असंच नारबाला वाटलं, पण आज मात्र तो काही करू शकत न्हवता, गुपचूप आईसोबत चालणे याच्या शिवाय त्याला पर्याय न्हवता. मातीतून निघालेला सुगंध सकाळचे वातावरण अगदी ताजेतवाने करत होता, पण नारबाचे मात्र कशातच लक्ष न्हवते.


आईबरोबर चालताना नारबाच्या खिशातला साबण त्याच्या मांडीवर आदळायचा, तसतशी नारबाची भीती वाढायची. दोघेही  गोठ्यावर पोहोचले. नारबाच्या आईने नारबाचा हात सोडला आणि बोलली, "बादलीत पाणी घिऊन , आणि खिशातला साबण तिथं ठवून ." साबण असं आईने म्हटल्याबरोबर नारबाला एकदम अंधारून आलं. नारबाने पिछे मूड करून न्हाणी कडे प्रस्थान ठेवलं. सुदैवानं न्हाणीमध्ये कालसारखंच कुणी न्हवतं. पाण्याची बादली नळाखाली लावण्याअगोदर त्याने इकडे तिकडे पाहून खिशातला साबण काढून न्हाणीमध्ये ठेवला. आणि बादली भरायला लावली. नारबाच्या डोक्यात मात्र आता विचार चक्र जोराने फिरायला लागली. हे नक्की चाललंय काय आणि पुढं होणार काय याचा अंदाजच त्याला बांधता येईना. बादली भरली ती घेऊन नारबा परत गोठ्यात आला. आईने आजही त्याला शेणाची टोपली डोक्यावर उचलून दिली आणि नारबा उकिरड्याकडे चालायला लागला. आजही कचरा त्याच्या अंगावर सांडत होता आणि आजही त्याला त्याचे भान न्हवते. कारण काल अंगभरून सुवासिक साबणाने अंघोळ केली आणि आज अंगभरून मार खावा लागणार कि काय, अशी स्वप्नेच नारबाला दिवसा उजेडी दिसायला लागली. कचरा टाकून आल्यावर स्वच्छ हात धुवून नारबा धार काढायला बसला. आज कुणीच काही बोलत न्हवते. धार काढून झाल्यावर गुरांना खायला टाकून दोघेही घरी आले.


आज मात्र दूध घालण्याचे काम पांडू वर ढकलणे आपल्याला महागाचे पडू शकते, याची कल्पना नारबाला नक्कीच होती. नारबा कसलीच हुज्जत घालता थेट दूध घालायला डेअरीवर निघाला. घरी आल्यावर नक्की काय चित्रपट होणारे याचा अंदाज बांधणं अजून चालूच होतं. दूध डेअरीवर घालून नारबा घरी पोहोचला. दुधाची बादली खाली ठेवल्याचा आवाज आल्याबरोबर नारबाच्या आईने नारबाला घरात बोलावले. धडधड प्रचंड वाढली. उजेडातून आल्यामुळं घरात शिरल्या शिरल्या नारबाला काही दिसेना. आत आल्याबरोबर नारबाच्या आईने नारबाचा हात पकडला, आता मात्र नारबाने डोळेच मिटले, नारबाचे सगळे अवसानच गळाले होते. आणि आता मार खायची त्याच्या मनाने तयारी देखील केली होती. पण असे काहीच होत न्हवते, आईने त्याच्या हातावर वीस रुपयांची नोट ठेवली होती, आणि आई त्याला बोलली कि, "दुकानात जा आणि ईस रुपायात ईल त्यो वासाचा साबण घिऊन ." नारबाने डोळे उघडले तर खरेच त्याच्या हातावर वीस रुपयाची नोट होती. नारबाने होकारार्थी मान डोलावून तो दुकानाकडे निघाला. त्याने दुकानातून अंगाचा साबण घेतला आणि त्याचा वास घेऊन पाहिला कालच्या न्हाणीतून आणलेल्या साबणापेक्षा त्याला ह्या साबणाचा वास आणखीनच छान वाटला. पण सकाळी झोपेतून उठल्यापासून झालेल्या थराराचा विचार त्याच्या डोक्यातून अजून गेला न्हवता.


आपल्याला आईने आपल्या साबणचोरी बद्दल मारता, जे काही करवून घेतले. हे नक्की असे का केले असावे, हे जरा जरा नारबाला उमजायला लागले होते. रागावता, मारता नारबाने केलेली चूकिची कृती त्याच्या आईने त्याच पद्धतीने नारबाकडून दुरुस्त करवून घेतली होती. नारबाला आपण केलेली चूक लक्षात आली होती. पुन्हा आयुष्यात अशी चूक करायची नाही, असा चंग मनाशी बांधून नारबाने आजही सुवासिक साबणाने आंघोळ केली. आणि निदान साबण संपेपर्यंत तरी अशी सुवासिक अंघोळ तो दररोज करू शकणार होता

हि साबण चोरीची चूक नारबाच्या आईने डोळ्याखाली घातली नाही कारण अशीच जर सवय लागली तर ती कुठल्याच साबणाने धुवून निघणार नाही याची कल्पना नारबाच्या आईला असावी. मारून, रागावून संस्कार केले जातात ह्या गोष्टीला फाटा देऊन नारबावर अगदी आयुष्यभर उपयोगी पडेल असा संस्कार केलेल्या नारबाच्या आईला कोटी कोटी प्रणाम

ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि ब्लॉगला SUBSCRIBE करायला विसरू नका.

किशोर पवार 

९१५६७२०८७८

3 comments:

१२ महिने २४ किल्ले ! #1. गरुडाचे घरटे ! "तोरणगड" (प्रचंडगड)

१२ महिने २४ किल्ले १.  तोरणागड (प्रचंडगड) गरुडाचे घरटे  हिंदू संस्कृतीमध्ये सणवार आला कि घराभोवती आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचे त...